logo

HOME   महाराष्ट्र

समाजाचा संतुलित विकास होण्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज - कुलगुरु

विद्यापीठात जागतिक महिला दिनानिमित्त विविध मान्यवरांचे व्याख्यान संपन्न

समाजाचा संतुलित विकास होण्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज - कुलगुरु  

अमरावती - समाजाचा संतुलित विकास होण्याची गरज आहे, स्त्री-पुरुष समानता त्यासाठी महत्वाची आहे.  महिला सक्षमीकरण व सबलीकरण आजची गरज असून त्यासाठी समाजाचा मार्इंडसेट बदलण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले.  विद्यापीठात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई, आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा गृहविज्ञान विभाग व कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम-2013 अंतर्गत तक्रार निवारण समिती यांचे संयुक्त विद्यमाने ‘विद्यापीठ महिला कर्मचायांचे आरोग्य व कायदेविषयक सक्षमीकरण’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजनप्रसंगी उद्घाटक तथा अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
    व्यासपीठावर अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोग, अमरावती जिल्हा समन्वयक जयवंत गाडेकर, श्रद्धा आर्ट सोसायटीच्या अध्यक्ष सौ. ज्योती तोटेवार, डॉ. मोहना कुळकर्णी, डॉ. सुप्रिया यादगिरवार, अॅड. सोनाली क्षीरसागर, गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. मनिषा काळे उपस्थित होते.
    कुलगुरु म्हणाले, महिला अधिकाराची चळवळ सर्वप्रथम न्युयार्क येथे सन 1909 ला सुरु झाली.  शतक होवून गेले; पण महिलांवरील अत्याचार सुरुच राहिले.  गेल्या आठ वर्षांपासून जागतिक महिला दिन साजरा होतोय.  त्याकाळी पुरुषप्रधान संस्कृती अशी समाजाची संकल्पना होती.  यापूर्वी अकराव्या शतकात चक्रधर स्वामींनी महिलांच्या समानतेविषयी चळवळ उभारली.
    ‘प्रेस फॉर प्रोग्रेस’ ही थीम यावर्षीच्या महिला दिनाकरीता शासनाने ठेवली असून महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक असून त्यानुशांने थीमचे महत्व अधिक असल्याचे सांगून कुलगुरु पुढे म्हणाले, भारताला अनेक पराक्रमी महिलांचा गौरवशाली इतिहास लाभला आहे.  महिला अनेक क्षेत्रात आज अग्रेसर आहेत.  गुणवत्ता यादीत मुलींची संख्या नेहमीच अधिक असते.  सर्वच महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने सक्षमीकरणाचे मेळावे आयोजित व्हावे, त्यानुषंगाने सक्षम महिलांनी इतर महिलांना या प्रवाहात आणून त्यांचा सामाजिक विकास कसा होईल, यासाठी प्रयत्नरत रहावे आणि महिलांचा स्वाभिमान व आरोग्य उंचावण्याचा प्रयत्न करावेत, असे आवाहन करुन पुढीलवर्षी महिला दिन पुरुषांनी साजरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    जयवंत गाडेकर यांनी समाजात महिलांचे स्थान महत्वाचे असून सक्षमीकरण महिलाचं आणू शकतात.  स्त्री शिक्षित होत असून कुटुंबामध्ये तिला आदराचे स्थान प्राप्त होत आहे.  सौ. ज्योती तोटेवार म्हणाल्या, तात्पुरता महिला दिन साजरा न होता महिलांनी महिलांना समजून घेवून त्यांचेसाठी सातत्याने काम करण्याची गरज आहे.  महिलांवर महिलांकडून होणारा अन्याय, अत्याचार, त्यासाठीची मानसिकता बदलण्याची गरज असून महिलांनी कुठल्याही परिस्थितीत आपली हिंमत, ताकद ढासाळू देवू नका, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
    नंतरच्या सत्रात ‘हेल्थ आस्पेक्ट’ या विषयावर डॉ. मोहना कुळकर्णी यांनी, अॅड. सोनाली क्षीरसागर यांनी पोस्को कायदा, तसेच महिला विषयक कायद्यावर डॉ. सुप्रिया यादगिरवार यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यानातून माहिती दिली.
    विद्यापीठ गीताने सुरु झालेल्या कार्यक्रमात संत गाडगे बाबा व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. मनिषा काळे यांनी रोपटे देवून पाहुण्यांंचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.  संचालन डॉ. वैशाली धनविजय यांनी, तर आभार ज्ञानस्त्रोत केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. वैशाली चौखंडे यांनी मानले.  कार्यक्रमाला विद्यापीठातील विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी विशेषत: महिला, शहरातील गणमान्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Top