गडचिरोली:जिल्ह्यातील सिरोंचा वन विभागातील रेपणपल्ली वनपरिक्षेत्रात १८ दिवस मुक्काम ठोकून कमलापूर वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तीने आता भामरागड विनाविभागात एन्ट्री केला आहे.त्यामुळे सिरोंचा,आलापल्ली नंतर आता भामरागड वनविभागात देखील त्या रानटी हत्तीची दहशत निर्माण झाला आहे.
मंगळवार २३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास रानटी हत्तीने चिरेपल्ली (कोत्तागुडम) येथील परशुराम सोयाम यांच्या घराचे नुकसान करत ताडगूडा गावात देखील धुमाकूळ घातला होता.त्यानंतर पेरमिली वनपरिक्षेत्रातील आरेंदा मार्गे कोरेली गावात रात्रीच्या सुमारास त्या रानटी हत्तीने शेतातील घराचे नुकसान केले. रानटी हत्तीला बघताच शेतकरी भयभीत होऊन पडून गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.आज २५ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कियर गावालगतच्या जंगलात त्या रानटी हत्तीचा मुक्तसंचार सुरू असून याही परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अगदी गावा लगत २०० मीटर अंतरावर रानटी हत्ती असूनही वन विभागाचे अधिकारी पोहोचले नसल्याचे गावकरी सांगत आहेत.
सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या रेपनपल्ली वनपरिक्षेत्रातील बल्लाळम जंगलात शांतपणे तब्बल १८ दिवस मुक्काम ठोकलेल्या रानटी हत्तीने आलापल्ली वनविभागतील पेरमिली वनपरिक्षेत्रातून प्रवास करत थेट भामरागड वन विभागात एन्ट्री केला आहे.मात्र,या प्रवासात त्या रानटी हत्तीने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. सुदैवाने तेलंगाना प्रमाणे या ठिकाणी कुठलीही जीवितहानी नसली तरी त्या रानटी हत्तीची परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे सकाळी जंगलात गेलेल्या महिलांना हत्तीचे दर्शन झाले. हत्तीने महिलांचा पाठलाग करताच भयभीत झालेल्या महिलांनी गावाकडे धाव घेतली. गावात ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावातील काही लोकांनी वनविभागाला माहिती दिली. मात्र तीन ते चार तास ओलांडूनही वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र गावात पोहोचू शकले नाही. सदर रानटी हत्ती अजूनही कियर गावालगतच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.