पुलगाव (अविनाश भोपे): – “महायुती सरकारच्या पुढाकाराने ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र असे १०% आरक्षण महाराष्ट्र शासनाने कायदा करुन दिले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याचे वातावरण सुखद झाले आहे, परंतु मनोज जरांगे रोज एक नवी मागणी घेऊन शासनाला व जनतेला वेठीस धरत आहे. आज त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली फक्त उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाची, राजकीय स्वरूपाची आणि पातळी सोडून टीका केली आहे. जरांगे यांच्या या राजकीय वक्त्यव्याच्या मागे कोण आहे ? याचा अंदाज आज महाराष्ट्र राज्याला आला आहेच, मनोज जरांगे यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका करुन मराठा समाजाच्या नावाखाली जनतेला विनाकारण वेठीस धरू नये, जरांगे यांच्या राजकीय भूमिकेचा व तथ्यहीन केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, ” असा इशारा महाराष्ट्र भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी दिला आहे.
महाराष्ट्राचे महायुती सरकार मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळावे, म्हणून प्रयत्नशील आहेच. महाराष्ट्र सरकारची संपूर्ण यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लावून मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकाऊ आरक्षण मिळावे,यासाठी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन सर्व सहमतीने मराठा आरक्षण विधेयक पारित करून घेतले. त्यापूर्वी तांत्रिक अडचणी येऊ नये म्हणून सर्व प्रकारच्या आवश्यक बाबी पूर्ण करून घेतल्या. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष मराठा आरक्षण विधेयकाला पाठिंबा देऊन सरकारच्या प्रयत्नांना मान्यता देत आहे. परंतु मराठा नेते मनोज जरांगे रोज नवे पिल्लू काढून रोज वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. यावरून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याचे जरांगे ना घेणे देणे नाही. ते आपल्या बोलवत्या धन्याच्या इशाऱ्यानुसार मीडियाला खाद्य पुरवत आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीकाटिपणी करून त्यांनी आपल्या हेकेखोरवृत्तीचा कळस गाठलेला आहे. मनोज जरांगे यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची त्वरित जाहीर माफी मागावी, अन्यथा भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश राज्यात सर्वत्र तीव्र आंदोलन असा इशाराही भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी दिला आहे.