गडचिरोली: मागील दोन दिवसापासून सिरोंचा, आलापल्ली वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तीने भामरागड वनविभागात प्रवेश करताच कियर येथील गोंगलु रामा तेलामी या (५३) वर्षीय इसमाला पायाखाली तुडवून ठार केले.तर याच तालुक्यातील हिदूर येथील वयोवृद्ध महिलेवर हल्ला करत जखमी केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.वंजे झुरु पुंगाटी (अंदाजे ६०) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचा नाव आहे.
२५ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गट्टा वनपरिक्षेत्रातील खंड क्रमांक ५२८ मध्ये त्या रानटी हत्तीने गोंगलू तेलामी वर हल्ला करून ठार केले. त्यांनतर रानटी हत्तीने पामुलगौतम नदी ओलांडून हिदूर गावाच्या जंगलात प्रवेश केला. त्या ठिकाणी देखील एका वयोवृद्ध महिलेवर हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेत ती वृद्ध महिला थोडक्यात बचावली असलेतरी या परिसरात रानटी हत्तीची एकच दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार हिदूर येथे लग्न समारंभ असल्याने येथील काही लोकं गावालगत असलेल्या माता मंदिरात गेले होते.पूजाअर्चा करून गावाकडे परत येत असताना पाठीमागून आलेल्या रानटी हत्तीने वंजे झुरु पुंगाटी नामक वृद्ध महिलेला दोनदा सोंडेने आपटले.या घटनेमुळे इतर लोकांनी त्या ठिकाणाहून पड काढला. रानटी हत्तीने त्या वयोवृद्ध महिलेला तिथेच सोडून अन्य लोकांचाही पाठलाग केला.त्याच क्षणी काही लोकांनी त्या आजीला त्या ठिकाणाहून उचलून गावात आणले. या घटनेत वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून छातीत आणि कमरेत गंभीर जखम झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीची वेळ असल्याने त्या महिलेला सध्यातरी घरीच ठेवण्यात आले आहे.
सदर रानटी हत्ती हिदूर जंगल परिसरात असून आरेवाडा, कृष्णार, भामरागड,हिता पहाडी, हिंदूर, मिरगुडवंचा,दोबुर,गुंडुरवाही या गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाची चमू या परिसरात दाखल झाले असून गावागावात जनजागृती करीत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. मात्र हिदूर येथील वयोवृद्ध महिलेची अजूनही वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट घेतली नसल्याचे गावातील लोकांनी सांगितले.