गडचिरोली:- लगतच्या तेलंगाना राज्यात दोन बळी घेऊन सिरोंचा वनविभागातील रेपनपल्ली वनपरिक्षेत्रात १८ दिवस मुक्काम ठोकून भामरागड वनविभागात नुकतेच दाखल झालेल्या त्या रानटी हत्तीने आणखी एक बळी घेतला आहे.गोंगलु रामा तेलामी (५३) रा.कियर ता.भामरागड असे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
मंगळवार २३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास रानटी हत्तीने चिरेपल्ली (कोत्तागुडम) येथील परशुराम सोयाम यांच्या घराचे नुकसान करत ताडगूडा गावात देखील धुमाकूळ घातला होता.त्यानंतर पेरमिली वनपरिक्षेत्रातील आरेंदा मार्गे कोरेली गावात रात्रीच्या सुमारास त्या रानटी हत्तीने शेतातील घराचे नुकसान केले. शेतशिवतात हत्तीच्या एंट्रीने शेतकरी भयभीत होऊन पडून गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.सदर हत्ती २५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास भामरागड तालुक्यातील कियर च्या जंगलात मुक्तसंचार करताना दिसून आला.याची माहिती मिळताच याही परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या रेपनपल्ली वनपरिक्षेत्रातील बल्लाळम जंगलात शांतपणे तब्बल १८ दिवस मुक्काम ठोकलेल्या रानटी हत्तीने आलापल्ली वनविभागतील पेरमिली वनपरिक्षेत्रातून प्रवास करत थेट भामरागड वन विभागात एन्ट्री केला आहे.मात्र,या प्रवासात त्या रानटी हत्तीने अनेक शेतकऱ्यांचे घराचे नुकसान केले आहे. तर कियर येथील गोंगलु रामा तेलामी त्या ५३ वर्षीय इसमाला पायाखाली तुडवून ठार केले.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे ३ व ४ एप्रिल रोजी तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांची बळी घेऊन रानटी हत्तीने प्राणहिता नदी ओलांडून रेपणपल्ली वनपरिक्षेत्रात प्रवेश केला होता. तब्बल १८ दिवस याच परिक्षेत्रात मुक्काम ठोकून २५ एप्रिल रोजी भामरागड वनविभागातील गट्टा परिक्षेत्र हद्दीत येत असलेल्या खंड क्रमांक ५२८ मध्ये या रानटी हत्तीने ५३ वर्षीय गोंगलु रामा तेलामी यांचा बळी घेतला. घटनास्थळी वनपरिक्षेत्र कार्यालय गट्टा चे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर आणि त्यांची चमू दाखल झाली असून मृतदेह शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे घेऊन गेले.