logo

HOME   यशोगाथा

राज्यभरातील पत्रकारांचे प्रेरणादायी नेतृत्व : संजयजी भोकरे

राज्यभरातील पत्रकारांचे प्रेरणादायी नेतृत्व : संजयजी भोकरे



राज्यातील ग्रामीण व शहरी भागात संघटनेत काम करणार्या प्रत्येक पत्रकाराला व वृत्तपत्राशी संबंधीत प्रत्येक घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने नेहमीच आग्रही भूमिका घेतलेली आहे. याच माध्यमातून संघाने पत्रकार संरक्षण कायद्यासाठी दिलेल्या लढ्याला यश मिळून पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आला. तसेच पत्रकारांसाठी ‘बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना’ शासनाने जाहीर केली हे देखील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केलेल्या पाठपुराव्याला आलेले यश असून यामागे संघाचे राज्य संघटक संजय भोकरे साहेब यांचे असणारे मार्गदर्शन आणि प्रेरणा महत्वाची ठरली. भोकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संघाच्या माध्यमातून त्यांनी केलेला कार्याचा हा आढावा..

राज्यातील बहुसंख्य वृत्तपत्रांचे संपादक तसेच पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाशी जोडले गेले आहेत. राज्यातील कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नागपूर, पश्‍चिम महाराष्ट, गोवा, बेळगाव या भागात संघटनेने सभासदांच्या विविध प्रश्‍नांवर मोर्चे, आंदोलने उभारुन हा पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणण्याच्या दृष्टीने स्वतंत्र लढा दिला.  

विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, ना. धनंजय मुंडे, गृहराज्यमंत्री ना. राम शिंदे, तत्कालिन महसुल मंत्री एकनाथ खडसे, ना. रामदास कदम, ना. पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते, यांसह राज्य मंत्री मंडळातील डझणभर मंत्र्यांकडे या कायद्यासाठी राज्य पत्रकार संघाने पाठपुरावा केला होता.  संघटनेने तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार व गृहमंत्री ना. सुशिलकुमार शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देऊन हा कायदा राज्य शासनास अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे हा कायदा अंमलात येणे शक्य झाले.
संघाचे मार्गदर्शक संजय भोकरे यांनी सांगली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालिन केंद्रीय संरक्षण मंत्री मोहन पर्रिकर, आसामचे राज्यपाल राम नाईक या सारख्या नेत्यांना आमंत्रीत करुन राज्य मराठी पत्रकार संघाची भूमिका सातत्याने स्पष्ट करत पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी पाठपुरावा केला आहे. त्यांच्याच पुढाकारातून सांगली, सोलापूर, कोहापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी पत्रकार भवन उभारण्यात आले आहे. याबरोबरच देशाच्या राजधानीतही पत्रकार भवन उभारले आहे.

पत्रकारांच्या पाल्यांना शिक्षणात सवलती मिळाव्यात, उच्च शिक्षणातही सवलती मिळाव्यात तसेच राज्य मराठी पत्रकार संघाचा विस्तार विविध राज्यात करण्यासाठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे प्रयत्नशील आहेत. सभासदांना संघटनेमार्फत पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण, शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्यक्रम, टोलनाके, सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी राखीव कोटा ठेवण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे. अधिस्वीकृती धारकांनाच राज्य शासनाच्या मोफत रेल्वे, एस. टी., एअरलाईन, शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्य दिले जाते त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांवर अन्याय होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांनाही या सवलती मिळाव्यात अशी संघाची भूमिका असून त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आरोग्य, विमा संरक्षण व मोफत प्रवास या तीन मुद्द्यांवर केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून ग्रामीण पत्रकारांना या सवलतींचा फायदा देण्याचा प्रयत्न संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

ग्रामीण भागासह वर्तमानपत्रातील श्रमिक पत्रकार, मुक्त पत्रकार, छायाचित्रकार यांच्या संरक्षणासाठी व लढ्यासाठी संघाने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे.
बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या निमित्ताने या लढ्याला काहीसे यश मिळाले आहे. मात्र इतरही लाभ पत्रकारांना मिळवून देण्याचा संघटनेचा आणि भोकरे साहेबांचा प्रयत्न आहे. संघाच्या वतीने दरवर्षी घेतल्या जाणार्‍या राज्यस्तरीय अधिवेशनात पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करुन मागण्यांचे ठराव शासनाकडे पाठवून त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा केला जातो. या अधिवेशनाच्या माध्यमातूनही पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते.

संघटनेमार्फत विभागनिहाय अधिवेशने, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, पत्रकार दिन, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव व पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे काम पत्रकार संघाच्या माध्यमातून सुरु आहे. संघाने दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांनाही आर्थिक मदतीचा हातभार लावला आहे.

संघामार्फत स्व. जवाहरलाल दर्डा जीवन गौरव पुरस्काराने दैनिक पुण्यनगरीचे मालक संपादक मुरलीधर शिंगोटे यांना सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक, पत्रकारीता, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणार्या व्यक्तींना व संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. पत्रकार संघाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार यांना एक लाख रुपये रोख स्वरुप असलेला जीवन गौरव पुरस्कार, अनंत दिक्षीत, मकरंद अनासपुरे, जॉकी श्रॉफ, मधु कांबीकर, अजिंक्य देव, सयाजी शिंदे, शिवाजी साटम, संतोष जुवेकर, विक्रम गोखले, सचिन पिळगावकर, विजय कदम, दिपाली सय्यद, क्रिकेटर अजिंक्य रहाणे, झहिर खान, रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर, स्वामी समर्थ गुरुकुल पीठाचे चंद्रकांत मोरे, इत्यादी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे.

पत्रकार संघाच्या माध्यमातुन दरवर्षी मोफत शालेय साहित्य, अंध अपंगांना मोफत सायकल वाटप करण्यात येते. पुणे येथे सकाळच्या बस डे उपक्रमाला 51 हजार रुपये पत्रकार जोतीर मिड्डे कुटूंबीयाला 51 हजार, नागपूर येथील पत्रकारास उपचारासाठी 51 हजार, ठाणे येथील कॅन्सरग्रस्त पत्रकारास 25 हजार तसेच वर्षभरातील सामाजिक धार्मिक कार्यक्रमासाठी संघटनेने देणगी दिली आहे.

भोकरे साहेबांच्या संकल्पनेतून पत्रकार संघाने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत राज्यभरातील पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोफत हेल्मेट वाटप केले. सांगली येथील श्रीअंबाबाई तालीम संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी शासनाचा छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविला आहे. ‘वस्ताद’ म्हणून ओळखले जाणार्या भोकरे साहेबांनी तालीम संस्थेच्या माध्यमातून अनेक मल्लांना घडवले आहे.

संपूर्ण राज्यभरात पत्रकारांची मोट बांधण्यासाठी राज्य संघटक संजय भोकरे यांच्या कल्पक नेतृत्वातून संघटनेचा विस्तार राज्याच्या पलिकडे जाऊन ‘ऑल इंडिया जर्नालिस्ट’ ची स्थापना करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे भव्य दिव्य इमारतीत हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. संजय भोकरे यांचे नेतृत्व राज्यभरातील पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे, असेच म्हणावे लागेल. ‘तुम जीओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार’.
  
शब्दांकन : विश्‍वासराव आरोटे (राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ)


Top