logo

HOME   महाराष्ट्र

रुग्णांच्या वाट्याला उघड्यावरच उपचार

प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत जर्जर : लोकसहभागातून शेडचे बांधकाम सुरू

रुग्णांच्या वाट्याला उघड्यावरच उपचार

गडचिरोली :- ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची दर्जेदार सेवा देण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा गवगवा केला जातो.मात्र, सिरोंचा तालुक्यातील झिंगानुर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचा उघड्यावरच उपचार सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी 1993-94 मध्ये बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था झाली असून इमारत पूर्णपणे गळत असल्याने या परिसरातील रुग्णांच्या उपचार उघड्यावरच केला जात आहे. रुग्णालयात रिक्तपदे असल्याची बातमी आपण वारंवार वाचत असतो मात्र याठिकाणी रुग्णांच्या उपचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही सुसज्ज इमारत नसल्याने या परिसरातील लोकांना उघड्यावरच उपचार घेऊन समाधान मानावे लागत आहे.    सिरोंचा तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेला हा गाव छत्तीसगड सीमेलगत असून हा अत्यंत दुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग आहे या परिसरात कोरला, कोपेला, सोमनपल्ली, वेनेलाय, वडधेली, मंगीगुडम,येडचिली, किष्टापल्ली, करजेली,रमेशगुडम आणि अहेरी तालुक्यातील कल्लेड आदी गावांचा समावेश असून या सर्व गावातील नागरिक याच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात. हा परिसर अत्यंत दुर्गम असून ये जा करण्यासाठी मुख्य रस्ते नसल्याने तालुका मुख्यालयात अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाने शक्य होत नसल्याने याच प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णांचा भार आहे. मात्र सुसज्ज इमारत नसल्याने येथील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा अडचणींना समोर जात असताना सुद्धा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दखल न घेतल्याने येथील सरपंच कारेजी मडावी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पोलीस विभाग या सर्वांच्या सहकार्याने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर लाकडी शेड उभारण्याचे काम सुरू केली आहे.   या शेड मधूनच येथील रुग्णांचा उपचार होणार असल्याची माहिती परिसरातील लोकांनी दिली आहे. सध्या मुसळधार पावसाचा कहर सुरू असून खेड्यापाड्यात साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण होत आहे दिवसेंदिवस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांच्या उपचारासाठी सुसज्ज इमारत नसल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. करिता प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी सिरोंचा पंचायत समितीच्या सभापती सौ कमला गावडे,माजी पंचायत समिती सभापती वंगी मडावी,माजी सरपंच बोडका गावडे,गणेश कुमरी यांनी केली.Top