पुलगाव (प्रतिनिधी): वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात स्थित कोटेश्वर देवस्थान हे प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर असून, त्याचा महिमा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले हे मंदिर श्रद्धाळूंसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.
इतिहास व धार्मिक महत्त्व:
काशीखंडाच्या शिवपुराणात कोटेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. प्रभू श्रीरामाचे गुरू वशिष्ठ ऋषींनी येथे कोटी आहुती यज्ञ केल्याने या शिवलिंगाला “कोटेश्वर” हे नामाभिधान प्राप्त झाले. त्यामुळे या ठिकाणी महादेवाचे अनन्य साधक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
मंदिराचे वैशिष्ट्ये:
हे मंदिर हिरव्यागर्द वनराईने वेढलेल्या टेकडीवर स्थित आहे.
उत्तरवाहिनी वर्धा नदी मंदिराला प्रदक्षिणा घालत वाहते.
येथे तीरावरच प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर असून, योगी पुरुष मारुती महाराजांची समाधीही आहे.
मंदिराच्या परिसरात खोदकाम केल्यास अजूनही यज्ञाची राख आढळते.
मंदिराच्या कळसावर उगवलेल्या कडुलिंबाच्या झाडाची पाने गोड लागतात, तर वर्धा नदीच्या पाण्यात बेलपत्र सोडल्यास ते न तरंगता थेट तळाशी जाते.
महाशिवरात्रीला मोठी यात्रा:
दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विशेष अभिषेक, महाआरती आणि भव्य यात्रा भरते. श्रावण महिन्यातही येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. विदर्भातील शिवभक्तांसाठी कोटेश्वर मंदिर ही श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे.
हे पवित्र देवस्थान निसर्गरम्य वातावरणात स्थित असून, भक्तांसाठी शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळवण्याचे एक उत्तम ठिकाण आहे.













