मारेगाव | प्रतिनिधी (महेश खंगार मारेगाव)
मारेगाव तालुक्यातील बोरी खुर्द येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी मंगळवार (दि. 28 ) चक्क ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरातच एका वृद्धावर अंत्यसंस्कार करून तीव्र निषेध व्यक्त केला.
बोरी खुर्द येथील रामदास पुरुषोत्तम मानकर (वय ७८) यांचे सोमवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. गावात कायमस्वरूपी स्मशानभूमी नसल्यामुळे आतापर्यंत गावकरी एका मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कार करत होते. मात्र, सध्या पावसाळा असल्याने त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्राम महसूल अधिकारी व ग्रामविकास अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले; मात्र ते पोहोचेपर्यंत अंत्यसंस्कार सुरू झाले होते.
यावेळी संतप्त ग्रामस्थांनी, बोरी खुर्द येथे कायमस्वरूपी स्मशानभूमीची व्यवस्था होईपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार करण्यात येतील,असा इशारा देत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
स्मशानभूमीसारख्या मूलभूत सुविधेअभावी गावकऱ्यांना अशा टोकाच्या भूमिकेचा अवलंब करावा लागल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.












