पुलगाव (प्रतिनिधी): पुलगाव येथील पवित्र वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या पंचधारा मोक्षधाम शिव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. 25 फेब्रुवारी रोजी ब्रह्म मुहूर्तावर भगवान शिवशंकरांचा दुग्धाभिषेक करण्यात येईल, त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाची सुरुवात होईल.
1987 पासून या मंदिरात शिवरात्री मेळाव्याची परंपरा सुरू झाली असून, दरवर्षी येथे हजारो भक्तगण मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. यावर्षीही विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी भाविकांनी मंदिर परिसरात शिवजीनची भव्य वरात काढून एक लाख मातीच्या लहान शिवलिंगांचे पूजन केले होते. त्यानंतर ही शिवलिंगे मोठ्या भक्तिभावाने वर्धा नदीच्या पात्रात विसर्जित करण्यात आली होती. पुलगावच्या समृद्धीसाठी भाविकांनी प्रार्थना केली होती.
यंदाही विविध मंडळांच्या वतीने फलाहार, साबुदाणा उसळ, वडे आणि शीतल दुधाचे वितरण करण्यात येणार आहे. बाबा बर्फानी ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविक भक्तांसाठी हा महाशिवरात्री महोत्सव एक भक्तिमय आणि पवित्र वातावरण निर्माण करणारा ठरणार आहे. पुलगावसह परिसरातील हजारो श्रद्धाळू या उत्सवाला हजेरी लावण्याची शक्यता आहे.













