वरोरा प्रतिनिधी :- साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कल्याणेश्वर गणेश मंडळ, कॉलरी वॉर्ड, वरोरा तथा स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १८ जुलै) स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा परिसरात श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत झालेल्या उपक्रमात युवकांनी शाळा परिसराची स्वच्छता करत अण्णाभाऊ साठे यांच्या श्रमप्रतिष्ठा आणि समाजसेवेच्या विचारांना कृतीतून अभिवादन केले.
उपक्रमाला वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी प्रमुख उपस्थिती लावत प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग घेतला. युवकांनी समाजोपयोगी कार्यासाठी पुढाकार घेणे ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे सांगत त्यांनी ‘एक तास समाजासाठी’ या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या वेळेतील काही क्षण समाजासाठी दिल्यास स्वच्छ, सुसंस्कृत आणि जबाबदार समाज घडविण्यास मोठी मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्थेचे सचिव आशिष घुमे यांनी सांगितले की, एक तास समाजासाठी या मोहिमेची सुरुवात १८ जुलैपासून करण्यात आली असून आठवड्यातील एक दिवस समाजहिताच्या कार्यासाठी देण्याचा संकल्प युवकांनी केला आहे. श्रमदान, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला वरोरा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखा तेलतुंबडे, नगरसेविका मनिषा संजय दानव तसेच नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे निरीक्षक भूषण सालवटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनीही श्रमदानात सहभागी होत युवकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
या श्रमदान मोहिमेत कल्याणेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष शंकर आत्राम, सुनील इंगळे, चेतन बुरडकर, ओम मोहिनकर, विकास कांबळे, तुषार किनाके, मनोज कामटकर, अमित टेकाम तसेच वॉर्डातील आकाश कोडापे, नेहाला सोयाम, अजय बावणे, मयूर ठाकरे, शुभम कोवेकर, रणजीत कुंभरे, राहुल बावणे यांच्यासह अनेक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित हा श्रमदान उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारी, लोकसहभाग आणि समाजसेवेचा संदेश देणारा ठरला. युवकांनी सुरू केलेल्या ‘एक तास समाजासाठी’ या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत अशा समाजोपयोगी उपक्रमांना सातत्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
PHOTO














