गडचिरोली : घनदाट जंगल, नद्या, धबधबे, ऐतिहासिक स्थळे आणि समृद्ध वनसंपदेने नटलेल्या गडचिरोलीच्या पर्यटनाला नवी ओळख मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात २३ ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे केवळ स्थानिकांपुरती मर्यादित न राहता राज्यभरातील पर्यटकांच्या नकाशावर आणण्यासोबतच स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह वन, महसूल, पर्यटन आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
गडचिरोलीतील पर्यटन एखाद्या एकाच स्थळापुरते मर्यादित न ठेवता उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा चार पर्यटन सर्किट्सच्या माध्यमातून विविध पर्यटनस्थळांना एकमेकांशी जोडण्यावर भर देण्यात येणार आहे.उत्तर सर्किटमध्ये टिपागड, मेंढालेखा, झाडापापडा आणि आरतोन्डी, तर दक्षिण सर्किटमध्ये फॉसिल पार्क, कमलापूर हत्ती कॅम्प आणि सोमनूर परिसराचा समावेश करण्यात आला आहे. पूर्व व पश्चिम भागात भामरागड त्रिवेणी संगम, हेमलकसा, मार्कंडा, चिचडोह बॅरेज, चपराळा अभयारण्य तसेच धनुरा आणि सेमाना परिसरातील पर्यटनस्थळांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
ट्रेकिंगपासून नाईट कॅम्पिंगपर्यंत…
महोत्सवात नागरिकांसह युवक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र तसेच स्थानिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांशी जोडण्यात येणार आहे.
पर्यटनस्थळांची ओळख व्यापक पातळीवर पोहोचवण्यासाठी ट्रेकिंग, नेचर वॉक, रील्स स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा आणि पर्यटन जनजागृती उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्याचबरोबर सेमाना, मार्कंडा आणि सिरोंचा परिसरात नाईट कॅम्पिंग, बोटिंग तसेच सायन्स पार्क भेटीचे उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पर्यटन वाढीसोबत स्थानिकांना रोजगाराची संधी
हा महोत्सव केवळ सहा दिवसांचा कार्यक्रम न राहता गडचिरोलीच्या पर्यटनाची दीर्घकालीन ओळख निर्माण करणारा उपक्रम ठरावा, यासाठी प्रत्येक पर्यटनस्थळाचे वैशिष्ट्य प्रभावीपणे पर्यटकांसमोर मांडण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
पर्यटनस्थळांवर स्वच्छता, सुरक्षितता, दिशादर्शक फलक, आवश्यक पायाभूत सुविधा आणि पर्यटकांसाठी सोयी-सुविधांची पूर्वतयारी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. स्थानिक ग्रामपंचायती, महाविद्यालये, युवक, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे.
गडचिरोलीच्या जंगल, जल आणि जैवविविधतेचा अनुभव पर्यटकांना देतानाच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, हा पर्यटन महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. प्रत्येक पर्यटनस्थळासाठी स्वतंत्र जबाबदारी निश्चित करून उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.












