वर्धा: सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय वर्धा आणि जलजीविका संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने समाज कल्याण सभागृह, वर्धा येथे मत्स्यव्यवसाय वृद्धीसाठी मत्स्यशेतकरी आणि मच्छीमारांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये 130 पेक्षा अधिक लाभार्थी व मत्स्यव्यवसायिकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय सुनील जांभुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मासे काढणे, हाताळणी, वाहतूक व विपणन या प्रक्रियांविषयी मार्गदर्शन केले.
वर्धा जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय स्वप्निल वालदे यांनी उपस्थितांचे स्वागत करत मत्स्य व्यवसाय वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले.
जलजीविका संस्थेचे सल्लागार समीर परवेज यांनी मत्स्यव्यवसायातील बाजारपेठेतील सोयी-सुविधा, मत्स्य उत्पादकांच्या समस्या आणि त्यांच्या तोडग्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान ॲक्वा ई-मित्र चाटबॉट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. या प्लॅटफॉर्मवर मत्स्यव्यवसायाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे.
कार्यशाळेत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लाभार्थी व पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन प्रकल्पातून चांगले उत्पादन घेणारे मयंक सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमएसडी, एक्वाकल्चर, नागपूर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला दी. रा. खोपे (स.म.वि.अ., वर्धा), बँक ऑफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक चेतन शिरभाते, नाबार्डचे प्रतिनिधी सुशांत पाटील, जिल्हा मच्छीमार सहकारी संघ मर्यादितचे अध्यक्ष किशोर जगताप, राज्य कार्यक्रम प्रबंधक, मिशन समृद्धी ऑर्गनायझेशनचे संजय बाभुळकर, बायफ फाउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर मकसूद शेख, जलजीविका संस्थेचे गणेश तुळसकर, आरती पुसदकर, दामिनी अखंड, सुजाता बेस, रेमा तवाडे, लखन माळी, बिर्जेश बेरवा तसेच महिला बचत गटाच्या महिला, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे पदाधिकारी व प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे इतर लाभार्थी उपस्थित होते.
कार्यशाळेमुळे मत्स्यव्यवसाय वृद्धीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विपणन आणि उत्पादकता वाढीसाठी नवे मार्ग खुले होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.












