वर्धा : पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य वर्धा जिल्हा समितीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ६ जानेवारी रोजी सत्यनारायण बजाज वाचनालय, मगनवाडी येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रामदास तडस होते. त्यांनी आपल्या भाषणात प्रिंट मीडियाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत म्हटले की, “लेखणी ही सामान्य जनतेसाठी नेहमीच अडचणीत आधारवड ठरली आहे. आधुनिक काळातही प्रिंट मीडियावर लोकांचा विश्वास कायम आहे. पत्रकारांनी आपली लेखणी समाजासाठी उपयोगी ठरवावी.”

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेशवर, शेतकरी नेते विजय जावंधिया, ज्येष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, नागपूर येथील लोकमतचे वरिष्ठ पत्रकार नरेश डोंगरे, कस्तुरबा हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. गिरीश देव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात पत्रकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिनेश श्याम पाटील, योगेश कांबळे, दिनेश घोडमारे, ओमप्रकाश ढवळे यांसह अनेक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ओमप्रकाश ढवळे यांना जमनाबाई जावंधिया स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देण्यात आला. त्यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम सामाजिक कार्यासाठी परत केली.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आशिष कुचेवार, बबन यादव, योगीराज कोचाडे, अकील शेख, डॉ. विठ्ठल लठे, अनिता येवले यांसह इतर समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश काळे यांनी केले, तर संचालन ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप रघाटाटे यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष शशांक चतारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजीव वाघ, विनोद महाजन, प्रविण करोले, संतोष देशमुख, बाळु मुंगले यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचे योगदान लाभले.













