कोरची:- जांभूळ हे मानवी आरोग्याला गुणकारी फळ आहे. कोरची तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक जांभूळ पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यात काही शेतकरी स्वतःच्या मालकीच्या जागेवर तर काही जंगल भागातील जांभळे गोळा करून खाजगी व्यापाऱ्याला विकतात. ह्या परिसरातील जांभळाला शहरी भागात मोठी मागणी आहे. येथे मोठ्या प्रमाणावर जांभूळ उत्पादीत होत असला तरी त्याचा फायदा हा जांभूळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना होतांना दिसत नसल्याने कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा यांच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी कोरचीच्या वतीने शेतकरी ते ग्राहक थेट जांभूळ विक्री सुरु केली आहे.
जांभूळ हे मधुमेहावर गुणकारी औषध आहे. जांभूळ हे वर्षातून एकतरी खाल्ले पाहिजे असे ग्रामीण भागातील जाणकार लोक सांगतात. जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील जांभळाची शहरात सर्वत्र खूप मोठी मागणी आहे. त्यामुळे व्यापारी कोरची येथून माल गोळा करून शहरी भागात पाठवितात. मात्र व्यापारी लोक शेतकऱ्यांकडून कमी भावाने घेऊन जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न करतात. हे टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी कृषी विभाग सरसावले आहे. स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत विकेल ते पिकेल या धर्तीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली आणि प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी कार्यालय कोरचीच्या वतीने तालुक्यातील शेतकरी गटांचे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र सुरु केले आहे.
तालुक्यातील महिला शेतकरी गटांकडून संकलीत केलेली जांभूळ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बेलगाव घाट येथील कोरची वंदना अग्रो प्रोडुसर कंपनीच्या माध्यमातून आणि तालुका कृषी अधिकारी विद्या मांडलिक यांच्या प्रोत्साहाने वडसा, आरमोरी आणि गडचिरोली येथे जांभूळ विक्री केंद्र सुरु करण्यात आले. गडचिरोली येथील विक्री केंद्राला आत्माचे प्रकल्प संचालक संदीप कऱ्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा मृद सर्व्हेक्षण मृद चाचणी अधिकारी गणेश बदाडे यांनी सदिच्छा भेट दिली. विक्री केंद्रामध्ये कोरची वंदना अग्रो प्रोडुसर कंपनीच्या संचालक रसिकाबाई गावतुरे, सायत्रीबाई सहारे, शेशीबाई सहारे, राधा मेश्राम, सीमा मोहुर्ले, रसिका आदे, सुरेखा नरोटी, चित्रलेखा लाडे यांनी विक्री केली तर विक्री केंद्राचे व्यवस्थापन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभूर्णे यांनी केले.