अहिल्यानगर :अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट खत तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या नेवासा बुद्रुक (ता. नेवासा) येथील एका बनावट खत तयार करणाऱ्या गोडाऊनवर छापा टाकून साडेसोळा लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.
पोलिस आणि कृषी विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. २) उशिरा ही कारवाई केली. याबाबत संबंधितावर नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नेवासा तालुक्यात बनावट खत तयार करून शेतकऱ्यांना विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या आदेशानंतर कृषी आणि पोलिस विभागाच्या पथकाने नेवासा बुद्रुक येथे सोमवारी (ता. २) जय किसान फर्टिलायझर अॅण्ड केमिकल्सच्या गोदामावर छापा टाकला.
या छाप्यात खताच्या भरलेल्या गोण्या, रिकाम्या गोण्या, शिलाई मशिन, दोरा बंडले, इन्व्हर्टर, खताचे तीन ढीग असा सुमारे १६ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य आढळून आले. संबंधिताचे कृषी सेवा केंद्र असून, त्याच्याकडे घाऊक खत विक्रीचा परवाना असून त्यात उल्लेख असलेली खते आणि गोदामात उपलब्ध असलेली खते यात तफावत आढळून आली. तसेच खत उत्पादनाचा किंवा को-मार्केटिंगचा परवाना नाही.
तरीही बाहेरून कच्चा माल आणून त्याचे पॅकिंग करून विक्री करत असल्याचे आढळून आले. संबंधित खतही बनावट असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी पथकाने पंचासमक्ष पंचनामा केला असून गोदाम सील केले.
पथकात कृषी अधिकारी प्रताप कोपनर, बाळासाहेब कासार, रखमाजी लांडे, राहुल ठोंबरे, प्रवीण देशमुख, दिलीप घोळवे आदींसह कृषी विभाग व पोलिस अधिकारी होते. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ खत नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन केल्याने प्रताप कोपनर यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा कृषी विभागाने अशा प्रकाराबाबत कडक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
खते, बियाण्यांचे याआधीही नेवाशात काळ्या बाजारात बियाणे विक्रीचे प्रकार आढळून आले होते. आताही उघडपणे बनावट खताची विक्री सुरू होती. त्यामुळे नेवासा तालुक्यातील कृषी विभागाचे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.