अहिल्यानगर : दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी केंद्र व राज्य शासनाने असंख्य योजना काढल्या असुन माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांनी त्याचा तळागाळातील बांधवांना लाभ मिळवून देण्यांसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले आहेत, तेंव्हा तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी संघटीत व्हावे असे प्रतिपादन कोपरगांव तालुका भारतीय जनता पक्ष दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे यांनी केले.
कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष कार्यालय व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कोपरगांव शहरातील संपर्क कार्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त बैठक आयोजित करण्यांत आली होती त्यात ते बोलत होते. यावेळी मुकबधीर विद्यालयाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. डुकरे सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.
श्री. मुकुंद काळे पुढे म्हणाले की, सन १९९१ पासुन माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी दिव्यांगांसाठी चालविलेला सेवेचा रथ पुढे माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी सहकारी साखर कारखान्यांचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणांत वस्तुच्या रूपात मदत करून त्यांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यांसाठी काम सुरू ठेवलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगाऎवजी दिव्यांग शब्दाचा वापर व्हावा म्हणून काम केले.
जेव्हा समाजातील धडधाकट व्यक्ती दिव्यांगांना आधार देईल तेंव्हाच त्यांचे जीवनमान उंचावेल त्यासाठी सर्व बाजुनी प्रयत्न व्हावेत. यावेळी दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यांत आले. कोपरगांव आगाराचे प्रमुख श्री. बनकर यांच्याकडे यावेळी दिव्यांग बांधवांना बसमध्ये आरक्षीत सीटवर प्रवास करण्यांत इतर प्रवासी सहकार्य करत नाही त्याबाबत सर्व वाहकांना सुचना देवुन ग्रामिण भागात दिव्यांग थांबा निर्माण करण्यांत यावा या आशयाचे निवेदन देण्यांत आले.
याप्रसंगी सर्वश्री. चांगदेव मैंद, दत्तात्रय धाकतोडे, जाकीरभाई शेख, ओम आहेर, कल्पना बुचकुले, ज्योती पठाडे, पुष्पा बंड, अशोक गागरे, मनिषा पवार, गंगुबाई वायकर, अलका कुचेकर, पवन शिंगी, शाम आहेर आदि दिव्यांग बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोपरगांव तालुका दिव्यांग संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष स्व बाळासाहेव आढाव यांनी तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सचिव जयवंत मरसाळे यांनी यावेळी दिली. शेवटी अध्यक्ष स्वप्नील कडु यांनी आभार मानले.