अहिल्यानगर :पीकविमा, पीककर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद, ॲग्रीस्टीक अंतर्गत सर्व योजना तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ठराविक मुदतीमध्ये ई-पीकपाहणी करुन घेण्याचे आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी शारदा जाधव यांनी केले आहे.
राज्यात ता. १ डिसेंबर पासून रब्बी हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना यापूर्वी पीक पाहणीसाठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते. परंतू केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे यामध्ये तांत्रिक बदल करत डिजिटल क्रॉप सर्वे (डीसीएस) मोबाईल ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याच ॲपच्या माध्यमातून राज्यात ई-पीक पाहणी होणार आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी करण्यासाठी ता. १ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२५ ही मुदत आहे. तसेच सहायक स्तरावर ई-पीक पाहणी करण्यासाठी १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ ही मुदत राहणार आहे.