मूल प्रतिनिधी (रोहित कामडे ) :
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळूनही तब्बल नऊ महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज (मंगळवार, दि. ४ ऑगस्ट) दुपारी २ वाजता मुल नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात शेकडो भाजप कार्यकर्ते आणि समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.
प्रवीण मोहूर्ले यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत सांगितले की, महात्मा ज्योतिराव फुले स्मारकाच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतरही नगर परिषदेकडून आवश्यक जागेचे मोजमाप करण्यात आलेले नाही. मुख्याधिकारी आणि संबंधित अभियंता यांच्या दिरंगाईमुळे संपूर्ण प्रक्रिया रखडल्याचा आरोप त्यांनी केला.
या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध सामाजिक संघटना, समाजबांधव आणि कार्यकर्त्यांनी अनेकदा निवेदने सादर केली. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याचा दावा मोहूर्ले यांनी केला आहे.
माळी समाजासह महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या नागरिकांच्या भावना प्रशासनाच्या या भूमिकेमुळे दुखावल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, नगर परिषद कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असून फुले यांच्या स्मारकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला.
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवीण मोहूर्ले यांनी केले आहे.













