अहेरी:शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे, विविध शाळांना नियमित भेटी देऊन अध्यापनाचा आढावा घेणे आणि शिक्षण व्यवस्थेला दिशा देणे, ही केंद्रप्रमुखांची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र अहेरी तालुक्यातील काही केंद्रांमध्ये या जबाबदाऱ्यांना हरताळ फासला जात असल्याचे चित्र समोर येत असून, काही केंद्रप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अहेरी तालुक्यात अहेरी, महागाव, बोरी, खमणचेरू, देवलमरी, आलापल्ली, वेलगूर, पेरमिली, राजाराम, जिमलगट्टा, उमानूर आणि देचलीपेठा अशी १२ केंद्रे आहेत. यापैकी बहुतांश केंद्रांना स्थायी केंद्रप्रमुख आहेत. काही केंद्रप्रमुख नियमित केंद्र शाळेत उपस्थित राहून शाळांना भेटी देतात, शिक्षकांना मार्गदर्शन करतात आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. मात्र काही केंद्रप्रमुख आठवड्यातून एखादा-दुसराच दिवस केंद्र शाळेत दिसतात, तर उर्वरित कारभार भ्रमणध्वनी आणि व्हॉट्सॲप संदेशांच्या माध्यमातून चालत असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.
सध्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळेची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ अशी करण्यात आली आहे. मात्र याच वेळेत काही केंद्रप्रमुख विविध माहिती संकलनासाठी शिक्षकांना केंद्र शाळेत बोलावत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षकांना वर्ग सोडून जावे लागत असून विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याबद्दल पालक आणि शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. माहिती संकलनासाठी शनिवारचा दिवस निश्चित असतानाही इतर दिवशी शिक्षकांना बोलावले जात असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
शिक्षण व्यवस्थेत गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, विषयतज्ज्ञ आणि शिक्षक अशी एक सुसंगत साखळी कार्यरत असते. या साखळीतील केंद्रप्रमुख हा सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जातो. शिक्षकांचे मार्गदर्शन करणे, शैक्षणिक अडचणी सोडविणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे आणि प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचणे ही त्यांची खरी भूमिका आहे. मात्र काही ठिकाणी ही भूमिका केवळ माहिती गोळा करून पुढे पाठविण्यापुरती मर्यादित राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.
याशिवाय काही केंद्रप्रमुख आपल्या नियमित शाळा भेटींसाठी किंवा विविध कामांसाठी कायम विशिष्ट शिक्षकांनाच सोबत घेऊन फिरत असल्याची चर्चा केंद्रातील शिक्षकांमध्ये आहे. त्यामुळे इतर शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून कामकाजात समान संधी आणि पारदर्शकता राखली जात नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
केवळ माहिती संकलन नव्हे, शैक्षणिक नेतृत्वाची गरज
केंद्रप्रमुख हा केवळ माहिती संकलित करणारा अधिकारी नसून शैक्षणिक नेतृत्व करणारा मार्गदर्शक आहे. त्यामुळे केंद्र शाळेत नियमित उपस्थिती, सर्व शाळांना सातत्यपूर्ण भेटी, प्रत्येक शिक्षकाला समान वागणूक, शैक्षणिक मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली गेली तरच शिक्षण व्यवस्थेला बळ मिळेल. काही आदर्श केंद्रप्रमुख आजही प्रामाणिकपणे ही भूमिका पार पाडत आहेत. मात्र केवळ अधिकारीसारखी भूमिका घेऊन केंद्रापासून दुरावलेल्या काही केंद्रप्रमुखांच्या कार्यपद्धतीची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
—————————————
यापूर्वी अहेरी तालुक्यात नियमित केंद्रप्रमुखांची संख्या कमी होती. मात्र आता देचलीपेठा केंद्र वगळता सर्व केंद्रांमध्ये स्थायी केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. प्रत्येक केंद्रप्रमुखाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना नियमित भेटी देऊन अध्यापनावर लक्ष ठेवणे, शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन करणे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा पोहोचेल किंवा कामकाजात हलगर्जीपणा दिसून येईल, असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. याबाबत पुढील केंद्रप्रमुखांच्या बैठकीत स्पष्ट सूचना देण्यात येतील.
-सुनील आईंचवार, गटशिक्षणाधिकारी, अहेरी












