मुल : प्रतिनिधी
शासनाच्या गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत मुल तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार, दिनांक २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, मुल येथील सभागृहात होणार आहे.
शासन निर्णय क्रमांक २०२६/प्र.क्र.१४/L-१७२२५००/आस्था-८, दिनांक ९ जुलै २०२६ अन्वये आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार राहणार आहेत.
या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागासह विविध शासकीय विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार असून, नागरिकांना शासनाच्या विविध योजना आणि सेवांचा लाभ तातडीने मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध योजनांचे लाभार्थी यांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मृदुला मोरे यांनी केले आहे.
शिबिरात मिळणार विविध सुविधा
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- आयुष्यमान भारत कार्डचे वितरण.
- जिवंत ७/१२ मोहिमेची अंमलबजावणी.
- सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील लाभार्थींना हयातीचे प्रमाणपत्र वाटप.
- आरोग्य तपासणी शिबिर.
- प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा.
- ७/१२ उताऱ्यातील दुरुस्ती तसेच डिजिटल ७/१२ व ८ अ उताऱ्यांचे वितरण.
- अभिलेख दुरुस्तीसाठी मदत केंद्राची स्थापना.
- मुल शहरातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR) विशेष शिबिर.
- लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध प्रमाणपत्रे व दाखले तात्काळ उपलब्ध करून देणे.
यामध्ये रहिवासी दाखला, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, मतदान कार्ड, रेशन कार्ड तसेच महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा व प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांची कामे एकाच ठिकाणी जलदगतीने पूर्ण व्हावीत, या उद्देशाने हे समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
मुल तालुक्यातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.













