अहेरी :आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-सीवरील नवीन पुलाच्या बांधकामाजवळ, जंगल परिसरात रस्त्याच्या कडेला हरिणाचे एक पाडस मृतावस्थेत आढळून आले. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मृत पाडसाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा असून त्याचा समोरील एक पाय शरीरापासून वेगळा झालेला दिसून येत आहे. त्यामुळे रानटी कुत्र्यांनी किंवा इतर एखाद्या वन्य भक्षक प्राण्याने हल्ला केला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पाडसाच्या मृत्यूचे नेमके कारण वनविभागाच्या पंचनामा व तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
आलापल्ली वनपरिक्षेत्र हे घनदाट जंगल, मौल्यवान सागवान आणि समृद्ध वन्यजीवांसाठी ओळखले जाते. अशा जंगल परिसरात हरिणाच्या पाडसाचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब मानली जात आहे.या घटनेची माहिती आलापल्लीचे उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार यांना देण्यात आली आहे. त्यांनी लवकरच वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले.
मात्र बातमी लिहिपर्यंत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण वनविभागाच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.













