गडचिरोली:जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने कहर केला असून, विशेषतः अहेरी उपविभागातील अहेरी व सिरोंचा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक पूल व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परिणामी शेकडो गावांचा बाह्यजगाशी संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सततच्या पावसामुळे आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला असून, पर्यायी मार्गही बंद पडल्याने वाहने अडकून पडली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसत असून, प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत, रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत, तर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठाही प्रभावित झाला आहे. नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
दक्षिण गडचिरोलीत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र, अपूर्ण राष्ट्रीय महामार्ग, वारंवार वाहून जाणारे रस्ते आणि पूरस्थितीमुळे नागरिकांचे हाल कायम आहेत. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे.
दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद
सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका येथे १०३ मिमी, असरअली येथे ८२.४ मिमी, तर बामणी येथे ७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे ७१.२ मिमी आणि अहेरी येथे ६८.०८ मिमी पाऊस झाला आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये अनेक नदी-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत असून परिस्थिती गंभीर बनली आहे.
तालुकानिहाय पावसाची नोंद (मिलीमीटरमध्ये)
गडचिरोली – १.३ मिमी
धानोरा – ३.७ मिमी
देसाईगंज – ३.० मिमी
आरमोरी – २.० मिमी
कुरखेडा – ०.० मिमी
कोरची – ०.० मिमी
चामोर्शी – ०.० मिमी
मुलचेरा – ०.९ मिमी
अहेरी – ५०.९ मिमी
सिरोंचा – ७६.४ मिमी
एटापल्ली – २.४ मिमी
भामरागड – ०.० मिमी
जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमान : १०.८ मिमी













