वरोरा : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वरोरा शाखेतर्फे रविवार, 19 जुलै रोजी युवाकुंभ 2026 या भव्य युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्भावना चौक येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकरी भवनात सकाळी 10 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
युवाशक्ती आणि राष्ट्रभक्ती हा मुख्य उद्देश समोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात 16 ते 35 वयोगटातील युवक-युवती सहभागी होणार आहेत. राष्ट्रनिर्मिती आणि युवा विकासाला चालना देण्याच्या हेतूने विविध मार्गदर्शनपर व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संपर्कप्रमुख अरविंद कुकडे उपस्थित राहणार आहेत. तसेच नागपूर येथील प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक सचिन जगताप हे करिअर नियोजन, उद्योजकता आणि व्यवसायाच्या संधींबाबत युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
युवाकुंभमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा, विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या युवा प्रतिभांचा तसेच स्थानिक यशस्वी उद्योजकांचा गौरव करण्यात येणार आहे.
दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात राष्ट्रनिर्मिती विषयावरील परिसंवाद, क्रीडा उपक्रम, नेटवर्किंगची संधी, विविध प्रदर्शने आणि प्रेरणादायी व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
नवे मित्र, नवे विचार, नवे संकल्प या संकल्पनेवर आधारित या युवाकुंभात मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













