अहेरी: अहेरी पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात कारवाई करत 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 221/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलै रोजी पहाटे 3.30 ते 4.40 वाजण्याच्या सुमारास मौजा आलापल्लीपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर संशयित पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर (क्र. HH 04 FZ 5092) या कारची दोन पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान कोणताही वैध परवाना किंवा पास नसताना देशी दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.
कारमधून 90 एमएल क्षमतेच्या ‘रॉकेट संत्रा’ देशी दारूचे 40 बॉक्स जप्त करण्यात आले. प्रत्येक बॉक्समध्ये 100 बाटल्या असल्याने एकूण 4,000 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूची अंदाजे किंमत 3 लाख 20 हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कार (अंदाजे किंमत 5 लाख रुपये) देखील जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश वळवी हे पुढील तपास करीत आहेत. कारवाईदरम्यान पोलीस हवालदार महेश जगपत सडमेक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, दाखल अमलदार म्हणून पोलीस हवालदार मनोज शेंडे यांनी कामकाज पाहिले.













