सिंदी रेल्वे : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त येथे नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालिकेतील दोन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. बांधकाम सभापती ममता बोंगाडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी शिपाई पदावर कार्यरत हेमंत बावने तसेच पाणीपुरवठा विभागात कार्यरत राजू गीरीजापुरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. नागरिकांच्या प्रत्येक हाकेला तत्परतेने प्रतिसाद देणारे आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून सेवा बजावणारे हे दोन्ही कर्मचारी पालिकेचा ‘श्वास’ असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
विशेषतः शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळताना राजू गीरीजापुरे दररोज व्हॉल्व्ह उघडणे-बंद करणे यासारखी महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. तर हेमंत बावने हे नेहमीच नागरिकांच्या सेवेसाठी धावून जाणारे कर्मचारी म्हणून ओळखले जातात. कामाच्या दरम्यान अनेकदा रोषाला सामोरे जावे लागूनही कोणतीही नाराजी न ठेवता हसतमुखाने सेवा देणारे हे कर्मचारी खऱ्या अर्थाने सत्कारास पात्र असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या कार्याची दखल घेत ममता बोंगाडे यांनी कामगार दिनी त्यांचा सन्मान करून प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राणी कलोडे होत्या. उपाध्यक्ष अकील शेख व मुख्याधिकारी पूर्णिमा गावीत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व विषय समितीचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच पालिका कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.













