वर्धा: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वसतीगृहातील निकृष्ट भोजनाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले आहे. भोजनात अळ्या, किडे, झुरळ सापडत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
विद्यापीठातील भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांच्या नावाने असलेल्या वसतीगृहातील भोजन अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, त्यामुळे आरोग्य धोक्यात येत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. वारंवार तक्रारी करूनही योग्य तो बदल न झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी वसतीगृहासमोर आंदोलन सुरू केले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत – भोजनाचा दर्जा सुधारावा, त्यासाठी दैनंदिन मेन्यूकार्ड असावे, तसेच संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी. प्रशासनाने यासंदर्भात लेखी हमी द्यावी, अन्यथा आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
विद्यापीठ प्रशासनाने भोजनालयासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असली तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही. परिणामी, काही कर्मचाऱ्यांवरच भोजनालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, या परिस्थितीत सुधारणा झाली नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी वसतीगृहातील सडलेल्या भाज्या रस्त्यावर आणून आपला निषेध नोंदवला.
संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आनंद पाटील यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विद्यापीठाला नुकतेच पूर्णवेळ कुलगुरू लाभले असले तरी पदभार स्वीकारताच त्यांना या आंदोलनाचा सामना करावा लागत आहे.
या आंदोलनामुळे विद्यापीठातील प्रशासन, विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यातील वाद आणखी चव्हाट्यावर आले असून, विद्यार्थी त्यांच्या मागण्यांवर ठाम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.













