पुलगाव, प्रतिनिधी — शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर दुर्लक्षामुळे पुलगाव येथील फर्टिलायझर कारखान्याजवळील नगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंडला काल सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. सायंकाळी सुमारे साडेसात वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच मोठे रूप धारण केले.
नगरपालिकेकडून शहरातील कचरा या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी जमा केला जातो. मात्र, संबंधित ठेकेदाराकडून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहिला होता. उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे अशा प्रकारच्या आगी लागण्याची शक्यता टेंडर अटींमध्ये नमूद असतानाही आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या.
आग लागल्यानंतर नगरपालिकेच्या अग्निशमन दलासह सीएडी कॅम्पच्या अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी परिसरात धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
घटनास्थळी नगरसेवक रवि केसरवानी, समीर जगनाडे, सुनील ब्राह्मणकर आणि शेख नाजिम यांनी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला व प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
दरम्यान, या घटनेमुळे नगरपालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमांनुसार अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहणे बंधनकारक असताना अनेक कर्मचारी वर्धा, नागपूर, आर्वी येथून रोज अप-डाउन करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद मिळण्यास अडथळे येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
नागरिकांनी कचरा व्यवस्थापनाबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची आणि जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.













