अहेरी: तालुक्यातील आलापल्ली-अहेरी रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून, येथे नेहमीच वाहनांची खूप वर्दळ असते. मात्र, प्राणहिता पोलिस उपमुख्यालयापासून अहेरीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला साईड बंबसाठी टाकलेल्या मुरूममुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. संबंधित कंत्राटदाराने तात्काळ काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
हा रस्ता अनेक वर्षे खराब अवस्थेत होता. विविध पक्षांच्या आंदोलन व उपोषणांनंतर आलापल्ली-प्राणहिता आणि अहेरी मुख्य चौकापर्यंत डांबरीकरण पूर्ण झाले. मात्र, प्राणहिता पोलिस उपमुख्यालय ते हनुमान मंदिरापर्यंतचा भाग अजूनही प्रलंबित होता. महिनाभरापूर्वी हे काम सुरू झाले, पण साईड बंबसाठी दोन्ही बाजूंना टाकलेला मुरूम अद्याप काढला गेला नाही.
या रस्त्यावर पोलिस उपमुख्यालय, महिला व बाल रुग्णालय तसेच तालुका कार्यालयांमुळे रोज शेकडो वाहने व नागरिक फिरतात. मुरूम रस्त्यावर पसरल्याने वाहनांना अडचण होतेय आणि एका बाजूने वाहन जात असताना दुसऱ्या बाजूने ये-जा अशक्य झाली आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
संबंधित विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन कंत्राटदाराला तात्काळ नोटीस बजावून काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अहेरी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.













