गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये कार्यरत कंत्राटी शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पेसा क्षेत्र कृती समितीने कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेऊन निवेदन साद केले.
अभिजीत दिपके हे आज एटापल्ली तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. याच दौऱ्यादरम्यान पेसा क्षेत्र कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन कंत्राटी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली.जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण कंत्राटी शिक्षकांचे आगामी समायोजन प्रक्रियेत समायोजन करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी समितीच्या वतीने करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त आणि अतिमागास भागातील शाळांमध्ये अनेक कंत्राटी शिक्षक १५ जुलै २०२४ पासून सेवा बजावत आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दुर्गम भागात सेवा बजावत असताना अध्यापनासोबतच मतदार यादीशी संबंधित कामे, मुख्याध्यापकपदाची जबाबदारी, शैक्षणिक माहिती संकलन, ऑनलाइन प्रशिक्षण तसेच विविध शैक्षणिक व प्रशासकीय कामांची जबाबदारीही हे शिक्षक पार पाडत असल्याचे समितीने म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर आगामी समायोजन प्रक्रियेत कंत्राटी शिक्षकांची सेवाज्येष्ठता व शैक्षणिक पात्रता विचारात घेऊन त्यांचे समायोजन करावे. रिक्त पदे उपलब्ध नसल्यास शाळांची आवश्यकता लक्षात घेऊन अतिरिक्त पदे निर्माण करून कंत्राटी शिक्षकांचे तत्काळ समायोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक आणि दुर्गम परिस्थिती लक्षात घेऊन कंत्राटी शिक्षकांच्या प्रश्नावर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, तसेच हे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती समितीने अभिजीत दिपके यांच्याकडे केली.
यावेळी पेसा क्षेत्र कृती समितीचे अध्यक्ष अरविंद शेडमाके, सचिव रंजित उंदिरवाडे, कोषाध्यक्ष तिलेश मोहुर्ले, संघटक लोकेश बारसागडे आणि उपाध्यक्ष सूरज मांदाळे उपस्थित होते.













