भामरागड:-भौगोलिक दुर्गमता आणि पूर्वीच्या नक्षलवादी परिस्थितीमुळे शासनाच्या विविध योजना, सेवा आणि त्यांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागलेल्या भामरागडमध्ये आता प्रशासन थेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत आज भामरागड येथील वीर बाबुराव शेडमाके गणेश मंडळात विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि नागरिक यांचा थेट संवाद घडवून आणण्यात आला.
वनपट्ट्यापासून घरकुलापर्यंत आणि कृषी योजनांपासून आरोग्य सुविधांपर्यंत नागरिकांनी आपल्या प्रश्नांवर थेट संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दुर्गम भागातील नागरिकांना विविध कार्यालयांत जाऊन माहिती घेण्याऐवजी एकाच व्यासपीठावर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी या उपक्रमामुळे उपलब्ध झाली.भामरागडसारख्या दुर्गम भागात शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांची अचूक माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे, योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रियेची माहिती मिळणे आणि नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांची प्रशासनाने थेट दखल घेणे महत्त्वाचे आहे. ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून गणेशोत्सवातील लोकसहभागाचा उपयोग याच उद्देशासाठी करण्यात येत आहे.
भामरागड येथील कार्यक्रमात नागरिकांनी वनपट्टे, कृषी विभागाच्या योजना, क्रीडांगण, वाचनालय, संजय गांधी निराधार योजना, माती परीक्षण, शेतकरी कर्जमाफी, घरकुल, सिटी सर्व्हे, प्रॉपर्टी कार्ड, आरोग्य सुविधा, नाली बांधकाम आदी विविध विषयांवर प्रश्न विचारले.संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक विषयाबाबत नागरिकांना उपलब्ध योजना, पात्रतेचे निकष, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या प्रश्नांबाबत संबंधित विभागाकडून थेट आणि अधिकृत माहिती मिळाली.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, तहसीलदार किशोर बागडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित सोनवणे, गटविकास अधिकारी अतुल इंगळे, गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील, तालुका कृषी अधिकारी कुणाल राऊत, आदिवासी निरीक्षक अजय पुंगाटी, मुक्तीपथ संघटिका निळा किन्नाके यांच्यासह विविध तालुकास्तरीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.












