गणेश उराडे | वरोरा प्रतिनिधी
वरोरा तालुक्यात काल झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आबामक्ता येथील अल्पभूधारक शेतकरी गणेश पेचे यांच्या शेतातील सौर ऊर्जा पॅनल पूर्णपणे उडून गेला आहे. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
व्हिडिओ
शेतात वीजपुरवठा मिळावा यासाठी पेचे यांनी महावितरणकडे डिमांड भरली होती. मात्र, शासनाच्या योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना थेट वीज जोडणी न देता सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले. महावितरणने सुमारे सहा महिन्यांपूर्वी 70 टक्के अनुदानावर 5 एचपी क्षमतेचे सौर पॅनल बसवून दिले होते.
काल झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे हे सौर पॅनल उखडून उडून गेले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून तत्काळ मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पीडित शेतकरी गणेश पेचे यांनी सांगितले की, आम्ही वीज जोडणीसाठी डिमांड भरली होती, तरीही आम्हाला सौर पॅनल योजना स्वीकारण्यास भाग पाडले गेले. जर वीज लाईन मिळाली असती, तर एवढे नुकसान झाले नसते.
दरम्यान, शासनाने बंद केलेल्या योजना पुन्हा सुरू कराव्यात आणि अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे













