चिमूर : शेषराव राऊत
चिमूर तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्षाने भीषण रूप धारण केलं असून, वाघाच्या हल्ल्यात आणखी एका निष्पाप व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसर हादरला आहे. वाहनगाव येथे घडलेली ही घटना केवळ वेदनादायीच नाही, तर प्रशासनाच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
वाहनगाव येथील शंकर दादाजी मसराम (वय ३५) हे आदिवासी परंपरेनुसार देवकार्य करण्यासाठी जंगलालगत गेले होते. धार्मिक विधी सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालत त्यांच्यावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, मृतदेहाची अवस्था अत्यंत विद्रूप झाल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे परिसरात भीती आणि संताप दोन्ही भावना तीव्र झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे प्रादेशिक अधिकारी किशोर देऊळकर तसेच चिमूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, चिमूर येथे पाठवण्यात आला.
मृतक शंकर मसराम हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली आणि दोन भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने आर्थिक मदत, योग्य भरपाई तसेच कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, चिमूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत वाघाकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शेतकरी, आदिवासी आणि जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन जीवन धोक्यात आले असून, सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
वन विभागाने वाघाच्या हालचालींवर तातडीने नियंत्रण ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी, अशी तीव्र मागणी स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.













