मुलमध्ये गॅस तुटवड्याविरोधात महिला काँग्रेसचे धरणे आंदोलन; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
मुल : शहर तसेच तालुक्यातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात एकही अधिकृत गॅस एजन्सी नसल्यामुळे तसेच गॅस पुरवठ्यातील तांत्रिक अडचणींमुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येविरोधात आता महिला काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संतोषसिंह रावत तसेच मुल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा एकता ताई समर्थ यांच्या नेतृत्वात गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता गांधी चौक, मुल येथे महिला काँग्रेसच्या वतीने धरणे व निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून गॅस तुटवड्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, नियमित गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि मुल तालुक्यात अधिकृत गॅस एजन्सी सुरू करावी, या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत. वाढत्या अडचणींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुल शहर व तालुक्यातील ज्या नागरिकांना गॅस सिलेंडरच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, त्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः संबंधित नागरिकांनी सकाळी १० वाजता काँग्रेस भवन, मुल येथे वेळेवर उपस्थित राहावे, असेही महिला काँग्रेस कमिटीने नमूद केले आहे.
या आंदोलनास मुल तालुका काँग्रेस कमिटी, नगर परिषद पदाधिकारी, नगरसेवक तसेच बाजार समितीचे पदाधिकारी यांचा पाठिंबा असून प्रशासनाला जागे करण्यासाठी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.













