गडचिरोली: शहीद पोलीस अधिकारी गणपत नेहरू मडावी यांच्या कुटुंबाला अनुकंपा तत्वावरील उपजिल्हाधिकारी (वर्ग‑1) पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून आणखी चौघांसह एका आरोपीने तब्बल 2 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, गडचिरोली पोलिसांनी 24 तासांत आरोपी ज्ञानेश्वर वारे याला पुणे परिसरातून अटक केली आहे.
गणपत मडावी यांचे सन 2013 मध्ये माओवादी चकमकीत शहीद होऊन त्यांचा मुलगा सागर गणपत मडावी याने अनुकंपा तत्वावर वर्ग‑1 पदासाठी अर्ज केला होता. सागर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पुण्यात ज्ञानेश्वर वारे याच्याशी ओळख झाली. वारेने मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून सागर आणि त्याच्या आई मीना मडावी यांची फसवणूक करीत गेल्या दोन वर्षात रोख, फोनपे व एटीएमद्वारे एकूण 2,16,79,100 रुपये उकळले.
सागर मडावी याने दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी पोस्टे गडचिरोली ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भादंविच्या कलम 318 (4), 3 (5) अन्वये ज्ञानेश्वर वारे व त्याचे चार सहकारी यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे गडचिरोलीच्या पथकाने साक्षीदारांच्या व तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपीचा ठाव‑ठिकाणा शोधून 20 एप्रिल 2026 संध्याकाळी पोस्टे राजगड, जि. पुणे येथून ज्ञानेश्वर वारेला ताब्यात घेतले आणि अटक केली.
आरोपी ज्ञानेश्वर वारे याला मा. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.तपास सहा. पो. नि. विजय मुसनवार (पोस्टे गडचिरोली) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, उर्वरित चार फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक प्रशासन गोकुल राज जी., सहा. पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि समाधान दौड व अंमलदारांनी यशस्वीपणे हाताळली आहे.













