सावत्र आई सवतीच्या मुलासोबत पसार; जावयाच्या दुचाकीवरून गाठले तेलंगणा
बीड (प्रशांत कुंडकर) : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून नातेसंबंधांना धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र आई आणि सवतीच्या मुलामध्ये प्रेमसंबंध निर्माण होऊन दोघे घरातून पसार झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाला पहिल्या पत्नीपासून दोन मुले व दोन मुली आहेत. मुलींची लग्ने झाली असून त्या सासरी स्थायिक आहेत, तर दोन्ही मुले वडिलांसोबत राहत शेतीकामात मदत करतात. कौटुंबिक वादामुळे पहिली पत्नी गेल्या सुमारे १५ वर्षांपासून वेगळी राहत आहे. त्यानंतर चार वर्षांपूर्वी या इसमाने एका परित्यक्ता महिलेशी दुसरे लग्न केले होते. तेव्हापासून सावत्र आई आणि सवतीची मुले एकाच घरात राहत होती.
दरम्यान, काही महिन्यांपासून सावत्र आई आणि सवतीच्या एका मुलामध्ये जवळीक वाढून त्यांचे संबंध प्रेमात परिवर्तित झाल्याची माहिती समोर आली आहे.
१२ एप्रिल रोजी संबंधित महिलेचा पती मुंबई येथे देवीदर्शनासाठी गेला होता. याच संधीचा फायदा घेत १५ एप्रिल रोजी सावत्र आई आणि मुलगा घरातून पसार झाले. विशेष म्हणजे, त्यांनी पळून जाण्यासाठी स्वतःचे वाहन न वापरता जावयाची मोटारसायकल (एमएच १३/बीयू १५८७) घेऊन पलायन केले.
या प्रकरणाचा उलगडा तेव्हा झाला, जेव्हा १६ एप्रिल रोजी तेलंगणा राज्यातील गच्चीबोली परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित दुचाकीवर दंड आकारण्यात आला. याबाबतचा मेसेज जावयाच्या मोबाईलवर प्राप्त झाला. त्यामुळे हे दोघे तेलंगणात असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी तपासाची दिशा त्या अनुषंगाने वळवली आहे.
या घटनेनंतर संबंधित पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तेलंगणा पोलिसांच्या मदतीने दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले असून परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. नातेसंबंधांच्या चौकटीला छेद देणाऱ्या या प्रकारामुळे सामाजिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.













