गोंडपिपरी ( सुरज माडूरवार )
गोंडपिपरी तालुक्यातील १२ गावांचा परिसर औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून या संदर्भातील अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.उद्योग, ऊर्जा,कामगार व खनिकर्म विभागाने ही अधिसूचना जारी केली असून ती महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम,1961 अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे.
राजपत्रानुसार गोंडपिपरी तालुक्यातील मोजा करंजी,चेक पेल्लूर,वडुकली,चेक वडुकली,शीरसी देऊळवार,चेक बेरडी, बोरगाव,धानापूर,चेक बोरगाव, लिखीतवाडा,वढोली व खरारपेठ या गावांचा परिसर औद्योगिक क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित भागात उद्योग उभारणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजपत्रात नमूद केल्याप्रमाणे या अधिसूचनेची अंमलबजावणी २५ फेब्रुवारी २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्राची अचूक सीमा व तपशील संबंधित नकाशांमध्ये दर्शविण्यात आले असून ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाहता येणार आहेत.
या निर्णयामुळे परिसरात उद्योगधंद्यांना चालना मिळण्याची शक्यता असून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.औद्योगिक क्षेत्र विकसित झाल्यास रस्ते, वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास होऊन परिसराच्या आर्थिक प्रगतीला गती मिळेल अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.तर दुसरीकडे मात्र आमच्या शेतजमिनी गेल्यास आमच्या पुढील पिढीचे काय होणार असा प्रश्न देखील आता काही शेतकऱ्यांकडून उपस्थित केल्या जात आहे.
औद्योगिक क्षेत्र घोषणेच्या पार्श्वभूमीवर पुढील टप्प्यात जमीन सर्वेक्षण,सीमांकन आणि औद्योगिक विकासाच्या प्रक्रिया सुरू होईल.
_ शुभम बहाकर ( तहसीलदार गोंडपिपरी)













