भामरागड : भामरागड तालुका मुख्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाची आढावा बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.
तालुक्यातील जिल्हा परिषदचे दोन गण आणि पंचायत समितीचे चार गण या संपूर्ण निर्वाचन क्षेत्रात पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील आदिवासी विविध सहकारी संस्थांच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तालुक्यातील केवळ २० टक्के धानच या संस्थेमार्फत विक्री करण्यात आले असून उर्वरित ८० टक्के धान अजूनही विक्रीअभावी अडकून असल्याची बाब समोर आली. धान साठवणुकीसाठी आवश्यक गोडाऊनची कमतरता असून उघड्यावर धान खरेदी करण्यास वरिष्ठांनी मनाई केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
बैठकीला जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज अली, अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, भामरागड तालुका अध्यक्ष इंदरशहा मडावी, तालुका कार्यकारी अध्यक्ष लालसू आत्राम, बाजार समिती अहेरीचे संचालक गफ्फार शेख, शहर अध्यक्ष रमेश बोल्लमपल्लीवार, युवा अध्यक्ष रोहित बोल्लमपल्लीवार, आदिवासी सेवक सब्बर बेग मोगल, माजी तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष रमेश मारगोनवार, ज्येष्ठ कार्यकर्ते सिताराम मडावी, बाजार समिती संचालक सैनू आत्राम, श्यामराव येरकलवार, ज्ञानेश्वर भांडेकर, संतोष भुरसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.













