धुळे – उमाकांत अहिरराव
साक्री तालुक्यातील गणेशपूर–दिघावे रस्त्यालगत आज दुपारी एक हृदयद्रावक अपघात घडला. माजी पोलीस पाटील प्रकाश दगा मराठे यांच्या शेतातील विहिरीजवळ कांद्याच्या चाळीतून ट्रॅक्टरमध्ये कांदा भरत असताना अचानक तोल गेल्याने ट्रॅक्टर सुमारे ६० ते ७० फूट खोल विहिरीत कोसळला.
या दुर्घटनेत दोन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाला असून एक मुलगी थोडक्यात बचावली आहे. मृतांमध्ये खुशी दादू ठाकरे (वय ४) आणि परी समाधान गायकवाड (वय ४) या दोन बालिकांचा समावेश आहे. तिसरी मुलगी सुदैवाने बचावली असून तिला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात एकच आक्रोश आणि शोककळा पसरली. गणेशपूर, दिघावे, छाईल आणि प्रतापपूर गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत उतरून त्यांनी जीवाचा धोका पत्करून बचावकार्य सुरू केले.
दरम्यान, साक्री पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्यात सहभागी झाले. मात्र विहिरीत पाण्याचे प्रचंड प्रमाण असल्याने हे काम अत्यंत जोखमीचे ठरत आहे.
गेल्या पाच ते सहा तासांपासून अखंड बचावकार्य सुरू असून, रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
या हृदयविदारक अपघातामुळे संपूर्ण साक्री तालुका दु:खात बुडाला आहे. मृत मुलींच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हळहळ आणि वेदना स्पष्ट दिसत आहेत. पोलीस अपघाताच्या कारणांची चौकशी करत असून, बचावकार्य सुरूच आहे.













