अहेरी:येथील गट साधन केंद्राने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त साहित्य वाटपाचा खास कार्यक्रम आयोजित केला. 4 डिसेंबर रोजी पार पडलेल्या या समारंभात 59 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी टीएलएम किट, व्हीलचेअर, स्मार्टफोन, सुगम्य केन, कान मशीन, ट्रायसायकल, रोलेटर आणि सी पी चेअर यांसारख्या अत्याधुनिक साधनसामग्रीचे वितरण करण्यात आले.
पंचायत समिती अहेरीचे गटशिक्षण अधिकारी सुनील आईचंवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी भारती रामगिरवार,विनायक पूरकलवार, केंद्रप्रमुख प्रवीण पुल्लूरवार,केंद्र विशेष शिक्षक पंकज मानकर, किशोर मेश्राम, राजू नागरे जितेंद्र राहुड, साधन व्यक्ती ज्ञानेश्वर कापगते, ताराचंद भुरसे, दीपा रामटेके, सुषमा खराबे, डिईओ राजेश चक्रमवार,दिव्यांग विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी सुनील आईचंवार यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण गाठण्यासाठी सातत्याने परिश्रम करण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षक, पालक आणि समाजाने एकत्र येऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.विशेष म्हणजे, राज्यघटनेने दिलेले अधिकार आणि आरक्षण फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्ष लाभ म्हणून मिळवायला हवेत, यासाठीही सर्वांनी सक्रिय प्रयत्न करावे, अशी विनंती त्यांनी उपस्थितांना केली.
सदर कार्यक्रम हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरल्याचे दिसून आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र राहुड यांनी तर प्रास्ताविक किशोर मेश्राम यांनी केली. पंकज मानकर यांनी आभार प्रदर्शन करून या मोहिमेच्या यशोगाथेला उजाळा दिला.
थेरेपी मार्गदर्शन कार्यशाळा

गट साधन केंद्राच्या वतीने अहेरी येथे विशेष गरजाधिष्ठित बालकांच्या पालकांसाठी एक अद्भुत थेरेपी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात तज्ज्ञ तथा मान्यवरांनी मोलाचा अनुभव व मार्गदर्शन दिले, ज्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या विकासासाठी नव्या दृष्टीकोनाची अनुभूती झाली.
समता सप्ताह होणार साजरा
3 ते 9 डिसेंबर दरम्यान समता सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या महत्त्वाच्या आठवड्यात विविध शाळांमध्ये रंगीबेरंगी व रोमांचक स्पर्धांचा आयोजन होईल.
यामध्ये चित्रकला, रांगोळी, भाषण, निबंध व कविता स्पर्धा, दौड, संगीत खुर्ची, नृत्य, नाटक, तसेच चमचा गोडीसारख्या मजेशीर स्पर्धा उत्साहाने पार पडतील. या स्पर्धांमुळे विद्यार्थी आपल्या कौशल्यांचा आविष्कार करतील आणि सर्वांसमोर आपली प्रतिभा चमकवतील.या समता सप्ताहामधील विविध उपक्रमांनी समाजात एकात्मता आणि सहिष्णुतेचा संदेश प्रसारित होईल अशी अपेक्षा आहे.













