अकोला जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जाहीर सभा झाली. यावेळी, बोलताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना घरं, शिक्षण आणि आरोग्य सुविधा दिल्या. लोक म्हणत होते आता हे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार. पण, मी माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना तुमचा हा देवाभाऊ बंद होऊ देणार नाही, असा शब्दच अकोल्यातली सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांननी राज्यातील लाडक्या बहिणींना दिला.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेची जादू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रचार सभांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेबाबतचं आश्वासन देत आहेत. काहीही झालं तरी ही योजना बंद पडणार नाही, असं ते ठासून सांगत आहेत. तसेच, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच आमचं सरकार आल्याचेही हे तिघे सांगत आहेत.
अयोध्येत मंदिर झाल्यानंतर आज कळस आणि धर्मध्वजाचं अनावरण झालं. मंदिराचं काम पूर्ण झालं तेंव्हाच समजलं जातं जेंव्हा कळसाचं काम पूर्ण होतं. अयोध्येच्या मंदिरावर जसा भगवा फडकला तसाच भगवा हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट नगरपालिकेवर भगवा फडकवा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी येथील सभेतून केले. पारदर्शी आणि प्रामाणिकतेने कारभार चालविण्यासाठी भाजपने उमेदवार दिले आहेत. हिवरखेड ग्रामपंचायतीचे थेट नगरपरिषद होण्याचे श्रेय आमदार प्रकाश भारसाकळे यांचे आहे. नगरपरिषद करण्याचं तुमचं म्हणणं मी ऐकलं, आता तुम्ही सत्ता द्या प्रत्येक शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे आहे असं आवाहन केलं आहे.













