गडचिरोली : मार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील जंगल परिसरात पट्टेदार वाघाचा वावर आढळून आला असून वनविभागाने नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी टि. एम. मोढळे यांनी दिलेल्या माहितीनुसार वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील जंगल परिसरात वाघ फिरत असल्याचे निरीक्षणात आले आहे.त्यामुळे येनापुर, दुर्गापुर, मुधोली चक नं. 2, लक्ष्मणपुर, गोलकर मुधोली, जैरामपुर, रामपुर, कढोली, अनखोडा, उमरी, चंदनखेडी, रायपुर, रामकृष्णपुर, बहादुरपुर, गुंडापल्ली, सुभाषग्राम, अडपल्ली, कोनसरी, कन्हाळगाव, रविंद्रपुर, धर्मपुर, सोमनपल्ली, आंबोली आणि वायगांव या गावांतील नागरिक किंवा पाळीव जनावरे जंगल परिसरात न जाता खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरातील ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या असून त्यांनी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन देखील करण्यात आले. वनविभागाकडून स्थानिक पोलीस ठाण्यांनाही माहिती देऊन आवश्यक ती दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आहे.
वाघांचा वावर हा नैसर्गिक घटक असला तरी मनुष्य व प्राण्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सर्वांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. कोणतीही अनोळखी हालचाल दिसल्यास त्वरित वनविभागास कळवावी.या घटनेमुळे परिसरात काहीसा भीतीचा माहोल निर्माण झाला असला, तरी वनविभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी टि. एम. मोढळे यांनी सांगितले.













