पोलादपूर तालुक्यातील शिवसेना समन्वयक सुदेश उतेकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला
पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासूनच पोलादपूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्वच राजकीय पक्षांनी संघटना बळकट करण्यासाठी पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु केला आहे. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे गावचे शिवसेना समन्वयक सुदेश उतेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह नरिमन पॉईंट, मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा जाहीर पक्ष प्रवेश पार पडला.
महाड पोलादपूर तालुक्यातील पंचक्रोशी मध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचें मोठे वर्चस्व असताना देखील काही दिवसांपूर्वी शिवसेना पोलादपूर तालुका प्रमुख अनिल मालुसरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठे यश मिळविण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार भरत गोगावले यांना दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
तुर्भे उपसरपंच राजेश उतेकर, शिवसेना रायगड जिल्हा संघटक आनंद पवार, लोहारे विभाग युवासेना प्रमुख गणेश पवार, सुहास उतेकर, आदेश उतेकर, ऋतिक उतेकर, साहिल उतेकर, वैष्णव सोनाते आदिंनी यावेळी भाजपा मध्ये पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे पोलादपूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला बळ मिळणार आहे.
आगामी काळात पोलादपूर तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी मी सदैव प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रीया सुदेश उतेकर यांनी व्यक्त केली.













