मुंबईचा महापौर कोण यावर सर्व मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच शिवसेना ठाकरे आणि मनसे अधिकृत युती होण्याआधीच महापौर पदावरून रस्सीखेच पहावयास मिळत आहे. भाजपा महायुती आणि ठाकरे गट-मनसेकडूनही महापौर पदावरून दावे केले जात आहेत. ठाकरे बंधूंची युती अधिकृतपणे जाहीर झाली नसली, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच ठाकरे बंधूंची युतीचे कशातच काही नसताना उद्धवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांकडून महापौर पदावर दावे केल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी महापौर शिवसेनेचाच होणार, अशा आशयाचे बॅनर लावले होते. यावर पत्रकारांनी संदीप देशपांडे यांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, मुंबईचा महापौर मराठी माणूस होणार आणि मनसेचाच महापौर होणार. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनीही मुंबई मनपावर शिवसेनेचाच भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. मेळाव्यात बोलताना शिंदेंनी महायुतीचा महापौर होणार असल्याचे भाकीत केले.
दिवाळीनंतर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच बिगुल वाजणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीसाठी देखील चर्चा सुरु आहे. आगामी मुंबई पालिकेसाठी ठाकरे बंधूंची युती होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी दोघांच्या वारंवार भेटीगाठी ही होत आहेत. अशातच मुंबईचा महापौर कोण होणार यावर सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावे केले जात आहेत. मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार असा विश्वास काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला होता. परंतु आता ठाकरेबंधूंच्या युतीमुळे मुंबईचा महापौर कोण असणार? यासाठी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दोन्ही पक्षाचे नेते महापौरपदी आमचाच असणार असा दावा करीत आहेत. त्यातच आता मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि मनसेचाच होणार असा विश्वास मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनीही मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबईसाठी विशेष निर्णय घेतल्याचं शिंदेंनी अनेकदा सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्या मेळाव्याच्या बाहेर लागलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘मुंबईचा महापौर शिवसेनेचाच’ असे पोस्टर्स त्या ठिकाणी लावले होते. मात्र मेळाव्यात बोलताना शिंदेंनी महायुतीचा महापौर होणार असल्याचं सांगितले. असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेचाही मुंबईच्या महापौर पदावर दावा आहे हे लपून राहिलं नाही













