गडचिरोली:भामरागड तालुका मुख्यालयात असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने या पावसाळ्यात भामरागड तालुक्याचा सहाव्यांदा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
सध्या राज्यभर परतीच्या पावसाने कहर केला असून गडचिरोली जिल्ह्यात देखील एक आठवड्यापासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. विशेष म्हणजे दक्षिण भागात या पावसाने चांगलाच कहर केल्याचे दिसून येत आहे. शिवाय छत्तीसगड राज्यात झालेल्या पावसामुळे इंद्रावती नदीला पूर आला.त्यामुळे भामरागड तालुका मुख्यालयातील पर्लकोटा आणि पामुलगौतम नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.२८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हेमलकसा आणि भामरागड मधोमध असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आला आणि पूल पाण्याखाली गेला.
सध्या आलापल्ली ते भामरागड रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जवळपास १०० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे आणि सप्टेंबर या दोन महिन्यात जवळपास सहा वेळा भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला.सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलाच कहर केल्याने जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान भामरागड तालुक्यातील इंद्रावती, पामूलगौतम आणि पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा एकदा भामरागड तालुका मुख्यालयातील नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
————————–
आज पहाटेच्या सुमारास पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने सध्या या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-किशोर बागडे,तहसीलदार भामरागड













