मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि ‘कवी “सौमित्र” म्हणून ओळखले जाणारे किशोर कदम हे सध्या गंभीर अडचणीत सापडले असून, अंधेरी (चकाला) येथील त्यांचे राहते घर धोक्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील जनतेला मदतीचे आवाहन केले आहे.
*किशोर कदम यांनी आपल्या पोस्ट मध्ये काय म्हटले आहे.*
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते ,मंत्री ,मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचे आवाहन करीत आहे.
मेजॉरिटीच्या नावा खाली मी राहात असलेल्या सोसायटीमध्ये
रीडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहाती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे.
कमिटी मेम्बर्सनी काही महत्वाची कागदपत्र , अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चाकाला सारख्या अत्यंत प्राईम विभागात 33(11) आणि 33(12)B या DCPR खाली आमची इमारत SRA/स्लम डेव्हेलपमेंट खाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले आहे.
मुर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सरकारने मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत , कायद्याला धरून आवाज उठवतात , अन्याया विरोधात कायद्याने लढतात त्यांचा आवाजच एका अर्थाने बंद केला आहे. मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचे उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे.
एखादा सभासद जर चौकस असेल , कायद्याला धरून प्रश्न विचारत असेल आणि कमिटी मेम्बर्सला जर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील , कमिटी मेम्बर्स स्वतः काही अभ्यास न करता पँक आणि बिल्डरवर जर आंधळा विश्वास ठेऊन काम करत असतील तर त्या एका मेम्बरला गाळून वेगळा WTSAP ग्रुप स्थापन करून त्या एका मेम्बरला मुंबई सारख्या शहरात चक्क
बायकॉट केले जाते , त्याच्या पासून सगळी महत्वाची माहिती लपवली जाते , त्याच्या विरुद्ध सर्व सभासदांना भरवले जाते आणि तो सभासद रिडेव्हल्पमेंटच्या विरोधात आहे असे भासवले जाते ,त्याला एकटे पाडले जाते. ही एका प्रकारची शहरी एट्रोसिटीच असते ज्या साठी कायद्यातही काहीच तरतूद नसते ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.मुंबई सारख्या व इतर कोठेही असे सगळे घोळ झाल्या नंतर PMC आणि बिल्डर यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी समोर मग वर्षानुवर्षे सामान्य माणसाला हतबलपणे लढत बसावे लागते. अशा कितीतरी केसेस आज मुंबई शहरात प्रलंबित आहेत.
किशोर कदम यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील तसेच महाराष्ट्रातील नागरिकांना आपल्या घराच्या रक्षणासाठी पुढे येण्याची विनंती केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ही केवळ त्यांच्या घराची लढाई नाही, तर अशा प्रकारच्या पुनर्विकासातील अन्यायाविरोधात सामान्य माणसाच्या हक्कांची लढाई आहे.













