गडचिरोली: जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात सध्या डेंग्यूचा कहर सुरू असून एकाच आठवड्यात तिसरा बळी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.नैनतारा सुशील खराती (४५) रा.लगाम असे तिचे नाव असून ११ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे उपचारादरम्यान तिची प्राणज्योती मावळली.
मागील आठवडाभरापासून मुलचेरा तालुक्यातील लगाम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या लगाम,गीताली, मच्छीगट्टा,येल्ला, टिकेपल्ली,शांतिग्राम आदी गावांत डेंग्यूचा कहर बघायला मिळत आहे.लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील रुग्णांची लाईन लागली आहे.
६ ऑगस्ट रोजी येला येथील किश्टा बाबुराव टेकुलवार तर ७ ऑगस्ट रोजी त्याच गावातील सुधाकर पोच्या कोगीलवार असे दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती येथील उपसरपंच दिवाकर उराडे यांनी दिली. एवढेच नव्हे तर १० ऑगस्ट पर्यंत या एकाच गावात तब्बल ४१ डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या या परिसरात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे.दरम्यान ७ आगस्ट रोजी लगाम येथील नैनतारा सुशील खराती हिची प्रकृती बिघडल्याने तिला चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.मात्र,प्रकृर्ती अधिकच खालावल्याने ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.४५ मिनिटांनी तिची प्राणज्योती मावळली. अगोदर खाजगी नंतर शासकीय रुग्णालयात तिचे उपचार सुरू असल्याची माहिती तिचे पती सुशील खराती यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे एकाच आठवड्यात येल्ला आणि लगाम येथील तीन रुग्ण दगावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य विभाग कशाप्रकारे उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













