मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी कांदिवली परिसरातील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या ‘सावली’ या बारचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. अनिल परब यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सावली बार यासह जगबुडी नदीच्या वाळू उपशावरून योगेश कदमांवर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीसांनी योगेश कदम यांचा राजीनाम घ्यावा, अन्यथा मी कोर्टात जाईन, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.
“या डान्सबारमध्ये मुली नाचवून अश्लीलता पसरवली जाते, पोलिस स्टेशनच्या अगदी जवळ हे चालतेय, यावर कोण कारवाई करणार? समाजविघातक कृत्यांवर कारवाई करणे चांगलेच आहे, पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्सबार चालतोय, त्यावर कोण कारवाई करणार? असा सवालही अनिल परब यांनी केला आहे.
या सर्व प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष कारवाईची मागणी करणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. ते म्हणाले, मी आजच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकाऱ्याचे सगळे प्रताप भेटरुपाने देणार होतो. पण ते आज मुंबईत नाहीत. उद्या ते मुंबईत आल्यावर मी त्यांच्याकडे सगळी कागदपत्रे देईन. सावली बार हा कदम यांच्या पत्नीच्या नावे हे मान्य आहे. पण डान्सबारचे सर्व नियम तुडवले गेले. ऑर्केस्टासाठी पाच मुलींची परवानगी असताना 14 मुली सापडल्या. नृत्य करताना मुली लगट करत होत्या, हे सगळे पोलिस रेकॉर्डमध्ये आहे. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब कारवाई करावी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा कारण एकनाथ शिंदे त्यांचा राजीनामा घेऊ शकत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोका पण देवेंद्र फडणवीसांनी कदमांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा मी कोर्टात जाईल, असा सज्जड दम सरकारला भरला आहे













