इंदापूर आगार व प्रमुख बसस्थानकांच्या सुविधांसाठी परिवहन मंत्री यांच्याकडून मंजुरी – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे
भिगवण प्रतिनिधी – राजेंद्र शिंदे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अंतर्गत इंदापूर आगार तसेच बावडा, भिगवण आणि निमगाव केतकी बसस्थानकांतील सेवा-सुविधा सुधारण्यासाठी महत्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विधानभवन, मुंबई येथे आयोजित बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असून, तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.
या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रवासी आणि चालक-वाहकांसाठी आवश्यक सेवा-सुविधांवर विशेष भर दिला. यामध्ये बसस्थानकांचे नूतनीकरण, अंतर्गत काँक्रीटीकरण, रंगरंगोटी, स्वच्छतागृह सुधारणे आणि प्रवाशांसाठी आरओ प्लांट उभारणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील प्रवाशांना अधिक चांगल्या आणि सोयीस्कर सेवा-सुविधा मिळणार आहेत.













