मूल │ नागपूर येथील संत जगन्नाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराच्या प्रस्तावाला विदर्भ तेली समाज महासंघाने तीव्र आक्षेप घेतला असून, सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी दि. १८ मार्च २०२५ रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार, संस्थेच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, या नामांतराच्या निर्णयाला विदर्भ तेली समाज महासंघाने तीव्र विरोध दर्शवला असून, संस्थेचे मूळ नाव कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हा महासचिव कैलास चलाख यांनी सांगितले की, संत जगन्नाडे महाराज हे सामाजिक समरसतेचे प्रतीक असून, त्यांनी समाजाला समानतेचा संदेश दिला. त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या संस्थेचे नामांतर करणे हा समाजाच्या अस्मितेचा अपमान आहे. त्यामुळे हा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित प्रशासनास महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. जर सरकारने हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही, तर संपूर्ण विदर्भात तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल, असा इशारा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर कुंनघाडकर, तालुका अध्यक्ष राजेश सावरकर, कार्याध्यक्ष प्रशांत भरतकर, जेष्ठ सदस्य शामराव भुरशे, तालुका उपाध्यक्ष पलिंदर सातपुते, शहर कार्याध्यक्ष चेतन कामडे, सचिव प्रवीण येणुरकर, श्रीकृष्ण धोडरे, विजय नागोसे, पुरुषोत्तम बुरांडे, गिरडकर सर, श्रीकांत आंबडकर, सावन साठवणे, वेदांत बुरांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सदर नामांतराच्या प्रस्तावावर शासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.













